राज्य सरकारचा खर्च 70 कोटी रूपये
बंगळुरू –कर्नाटकमध्ये आठवडाभरात 3 कोटी 12 लाख महिलांनी सरकारी बसेसमधून मोफत प्रवास केला. त्यासाठी राज्य सरकारला 70 कोटी रूपये खर्चावे लागले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने जनतेला पाच हमी दिल्या. त्या राज्याची सत्ता मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या सरकारने संबंधित हमींच्या अंमलबजावणीसाठी पाऊले उचलली. त्या हमींपैकी एक असणाऱ्या शक्ती योजनेचा प्रारंभ 11 जूनपासून झाला. त्याअंतर्गत सरकारी बसेसमधून महिला मोफत प्रवास करू शकणार आहेत.
योजनेला पहिल्याच आठवड्यात भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यातून बहुतांश सरकारी बसेस महिला प्रवाशांनी शब्दश: भरून टाकल्या. धार्मिक स्थळांबरोबरच विविध ठिकाणी जाण्याची हौसही अनेक महिलांनी पूर्ण करून घेतली. त्यासाठी वृद्ध महिलाही अपवाद ठरल्या नाहीत.
त्यामुळे योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात संपूर्ण कर्नाटकात जणू महिला प्रवांशासाठीच सरकारी बसेस रस्त्यांवरून धावत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. केवळ बसेस नव्हे; तर अनेक बस स्थानके प्रवाशांच्या आणि विशेषत: महिलांच्या गर्दीने फुलल्याचे कर्नाटकने आठवडाभर अनुभवले.