मुंबई – अभिनेत्री प्रार्थना बेहरेने (Prarthana Behere) अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळाला होता. मात्र प्रार्थना बेहरेला वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
प्रार्थना म्हणाली, “लग्नानंतर मी नवऱ्यासोबत 45 दिवस बाहेर फिरून आले. घरी आल्यानंतर मी प्रार्थना बेहेरे वाटतंच नव्हते. कारण माझं वजन खूप वाढले होते. पण नंतर जेव्हा मला काम मिळत नाही, तेव्हा माझ्या लक्षात आले. मी जाड झाले होते. लोकांनीही वाटू लागले होते आता ही काम करणार नाही.”
“मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा मला कधीच वाटलं नाही की मी खूप जाड आहे. एक अभिनेत्री म्हणून मला बारीक किंवा व्यवस्थित दिसायला पाहिजे असे कधीच वाटले नाही. पण मी जशी होते तशी लोकांनी मला स्वीकारलं. मितवा, कॉफी आणि बरचं काहीमध्ये माझं वजन जास्त होतं.”
पुढे ती म्हणाली, “आता मला वाटते की ते खूप चूकीचे होते. अभिनेत्री म्हणून तुम्ही दिसायला योग्यच पाहिजे. त्यावेळेस मला हे लक्षात आलं नाही कारण मला गोष्टी आपोआप मिळत गेल्या. पण तीन वर्ष जेव्हा मला कोणतच काम मिळत नव्हत तेव्हा मला माझ्यातली कमतरता दिसू लागली आणि त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले.”
दरम्यान, प्रार्थना बेहेरेच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत प्रार्थनासह अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होता. याशिवाय प्रार्थना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.