Prarthana Behere : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची काल 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात जयंती साजरा झाली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एका कार्यक्रमासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने हजेरी लावली होती. मात्र यावेळी प्रार्थनाने शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. एकेरी उल्लेखाने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. अनेक तिच्यावर संताप व्यक्त केला. यानंतर तिने शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
लातूर येथे एका मॉलच्या उद्घाटनप्रसंगी प्रार्थना प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. मॉलचं उद्घाटन झाल्यानंतर भाषण करताना तिने भाषणात चार ते पाचवेळा महाराजांचा एकेरी उल्लेख करत शिवाजी जयंती असे म्हंटले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद दिसायला सुरुवात झाली. लातूरमधील शिवभक्तांकडून तिचा निषेध करण्यात आला. तसेच अभिनेत्रीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरदेखील फाडण्यात आले आहेत. तसेच प्रार्थनाने माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली. घडला प्रकार आणि आपली चूक लक्षात येताच अभिनेत्रीने माफी मागितली आहे.
प्रार्थनाचा माफीनामा
माफी मागतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिने म्हंटले की, ‘आज मी उदगीर येथे किसान मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय’,” असे प्रार्थनाने म्हंटले आहे.