माद्रीद – बेलारूसच्या अर्याना सबालेंकाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍशले बार्टीचा पराभव करत माद्रीद ओपनचे जेतेपदावर नाव कोरले. स्टुटगार्ट येथे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या जेतेपदाच्या पराभवानंतर सबालेंकाने परतफेड केली आहे.
माद्रीद ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत सबालेंकाला ऍशले बार्टीने कडवे आव्हान दिले. परंतु सबालेंकाने 6-0, 3-6, 6-4 असा तीन सेटमध्ये विजय मिळविला. या विजयासह तिने आपल्या कारकीर्दीतील दहावे जेतेपद जिंकले.
या विजयानंतर सबालेंका म्हणाली, खरं सांगायचे झाल्यास स्टुटगार्टमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर मी जखमी झाली होती. तीन सेटपर्यत झालेल्या या लढतीत माझे स्नायु दुखावले होते. या दुखापतीतून मी चार दिवसांत सावरले. यामुळेच मला जोरदार पुनरागमन करत विजेतेपद जिंकता आले, असे तिने सांगितले.
दुसरीकडे बार्टीला दोन वर्षांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. 2019मध्ये फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर बार्टीने रेड क्लेवर एकही सामना गमविला नव्हता. परंतु या सामन्यात सबालेंकाच्या पॉवर गेमचा बार्टीला सामना करता आला नाही. सबालेंकाने डब्ल्यूटीए रॅंकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून ही तिच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.