पलानीस्वामी यांचीच अण्णाद्रमुकमध्ये चलती; आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी

चेन्नई  -तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री के.पलानीस्वामी आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे सत्ता गमावली तरी अण्णाद्रमुकमध्ये पलानीस्वामी यांचीच चलती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच झालेल्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवण्यावरून अण्णाद्रमुकमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. मात्र, पलानीस्वामी यांनी पक्षातील स्पर्धक ओ.पन्नीरसेल्वम यांना त्या शर्यतीत मागे टाकले. पलानीस्वामी यांच्याच नेतृत्वाखाली अण्णाद्रमुक निवडणुकीला सामोरे गेला. मात्र, त्या पक्षाला तामीळनाडूची सत्ता गमवावी लागली.

त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली. तो निर्णय घेण्यासाठी अण्णाद्रमुकची तीन दिवसांपूर्वी बैठक झाली. मात्र, पलानीस्वामी की पन्नीरसेल्वम याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पलानीस्वामी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेता बनण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्या पदाची कोंडी फोडण्यासाठी आणि पक्षांतर्गत मतभेट टाळण्यासाठी तिसऱ्याच नेत्याकडे धुरा सोपवली जाईल, अशी चर्चाही सुरू झाली होती. मात्र, पलानीस्वामी यांच्या निवडीमुळे पक्षावर त्यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.