न्युयॉर्क :- अमेरिकेची नवोदित महिला टेनिसपटू कोको गॉफ हीने येथे सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तीने अंतिम फेरीत बेलारूसची मानांकित टेनिसपटू आर्यना सबालेन्काचा 2-6, 6-3, 6-2 असा पराभव केला.
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी गॉफने इतक्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली. तब्बल 2 तास 6 मिनिटे रंगलेल्या लढतीत सबालेन्काचा पराभव केला. गॉफचे कारकीर्दीतील हे पहिले ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. आर्थर ऍशे टेनिस कोर्टवर तब्बल 28 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत तीने झळाळता करंडक उंचावला.
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये सबालेन्काने बाजी मारली होती. तीने हा सेट 6-2 असा जिंकला. मात्र, गॉफने दुसरा सेट जिंकत सामन्यात बरोबरी केली. यजमान देशाची खेळाडू असल्याने चाहत्यांनी तीला सतत प्रोत्साहन दिले व त्यामुळेच तीचा खेळ उंचावला. दुसरा सेट तीने 6-3 असा जिंकताना सबालेन्काच्या सर्व्हिस आश्चर्यकारकरीत्या भेदल्या. तिसरा व निर्णायक सेट सुरु झाल्यावर सबालेन्काने एक गेम घेत आघाडी घेतली होती, मात्र, गॉफने सलग सलग चार गेम घेतल्या व आघाडी मिळवली.
सबालेन्काने पुन्हा एक गेम जिंकत दडपण आणण्याचा प्रयत्न केला मात्र, गॉफने पुन्हा एकदा सलग दोन गेम घेताना सामना जिंकला व विजेतेपदही पटकावले. ही कामगिरी करताना गॉफने अमेरिकेच्याच सेरेना विल्यम्सनंतरची सर्वात युवा महिला टेनिसपटू ठरण्याचा मान मिळवला. 1999 साली विल्यम्सने ही कामगिरी केली होती. गॉफ वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी विम्बल्डिन ग्रॅंडस्लॅमला पात्र ठरली होती. ही देखील एक ऐतिहासिक कामगिरीच ठरली होती.
2019 सालच्या विम्बल्डन स्पर्धेत पदार्पण केलेल्या गॉफला त्यावेळी चौथ्या फेरीपर्यंतच मजल मारता आली होती. त्यानंतर गेल्या वर्षीही तीने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तीला त्यावेळी विजेतेपदाने हुलकावणी दिली. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत तर तीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपूष्टात आले होते.
मला विजेतेपदाचा विश्वास होताा…
मी ग्रॅंडस्लॅम टेनिस जिंकू शकत नाही असे बोलणाऱ्या टीकाकारांना मी विजेतेपदाने उत्तर दिले आहे. या स्पर्धेपूर्वी देखील मी हा विश्वास व्यक्त केला होता व आता तो खराही असल्याचे सिद्ध केले आहे. मी पराभूत होणार असा ज्यांचा समज होता, त्यांना मी खोटे ठरवले आहे. या विजेतेपदाचा आनंद तर आहेच मात्र, पुढील काळातही ग्रॅंडस्लॅम स्पर्धांची आणखी विजेतीपदे मिळवण्यासाठी सज्ज बनले आहे, असे विजयानंतर गॉफ म्हणाली.