मुंबई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या 26 दिवसांपासून तुरुंगात असलेला आर्यन खान आज मन्नतवर पोहोचू शकतो. गुरुवारी उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर जामीन अर्ज शुक्रवारी सत्र न्यायालयात पोहोचला. आर्यनला सत्र न्यायालयातून सोडण्याचा आदेश तुरुंग व्यवस्थापनाला मिळणार आहे. यानंतर आर्यनची सुटका होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने तुरुंगात पोहोचून आर्यनसाठी जामीनपत्र भरले आहे. आता आर्यन येत्या काही तासांत त्याच्या घरी पोहोचू शकतो.
काही वेळापूर्वी शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यातून 4 वाहनांचा ताफा निघाला होता. यापैकी एका वाहनात शाहरुखही होता. मुलगा आर्यनला घेण्यासाठी तो आर्थर रोड जेलमध्ये पोहोचत आहे. आर्यनला कडक अटींसह जामीन मिळाला आहे.
उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशात काय आहे?
मुंबई उच्च न्यायालयाने 5 पानी जामीन आदेश जारी केला आहे. आर्यनला जामीन देताना कोणत्या अटींचे पालन करावे लागेल ते त्यात लिहिले आहे. एक लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. तसेच त्याचा पासपोर्ट पोलिस ठाण्यात जमा करण्यासही सांगण्यात आले आहे.
मुलाच्या सुटकेवर शाहरुखला आनंदाश्रू –
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आर्यन खान साठी देशातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची मदत घेण्याचा शाहरुखचा निर्णय योग्य ठरला. कनिष्ठ न्यायालयाने दोनदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनला गुरुवारी संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. मात्र, संध्याकाळी निकाल आला, त्यामुळे आर्यनची सुटका होऊ शकली नाही.
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, जेव्हा शाहरुख खान मला भेटायला आला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता हे अश्रू आनंदाचे आहेत. आता त्यांना दिलासा मिळाला आहे. आर्यन आता शाहरुखच्या वाढदिवशी (2 नोव्हेंबर) कुटुंबासोबत असेल आणि दिवाळीही घरी साजरी करू शकेल.
आर्यनच्या कायदेशीर टीमचे सतीश मानेशिंदे म्हणाले की, आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याच्याकडून ड्रग्सचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, आम्ही देवाचे आभार मानतो की त्याने आमची प्रार्थना ऐकली आणि आर्यनला जामीन मिळू शकला.
मन्नतवर चाहत्यांची गर्दी
आर्यनच्या जामिनाची बातमी आल्यापासून शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. रात्री उशिरा काही चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजीही केली होती. आजही प्रचंड गर्दी जमण्याची शक्यता लक्षात घेऊन मन्नतच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या अटींसह आर्यनला मिळाला जामीन
-आर्यन या प्रकरणातील अन्य कोणत्याही आरोपीशी संपर्क साधणार नाही.
-पुराव्याशी छेडछाड करणार नाही.
-पासपोर्ट स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जमा करावा लागणार.
-प्रसारमाध्यमांमध्ये भाषणबाजी करणार नाही.
-न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडणार नाही.
-एनसीबीला गरज पडेल तेव्हा सहकार्य करेल.
-यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्यात येईल.