Arya Ambekar : गायिका आर्या आंबेकरच्या गाण्याची जादू अनेक प्रेक्षकांना वेड लावून जाते. गायनाबरोबरच अभिनयातही स्वतःचं नाव कमावणारी मराठमोळी मुलगी आर्या आंबेकर नेहमीच आपल्या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. आतापर्यंत तिने अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.
याशिवाय आर्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने एक व्हिडिओ शेअर करत तिच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचं फुटेज आणि ऑडिओ तिच्या परवानगीशिवाय वापरल्यामुळे जाहीरपणे संताप व्यक्त केला आहे. आर्याने लाइव्ह कार्यक्रमांमध्ये गायलेली गाणी काही लोकांनी रेकॉर्ड करून अनेक युट्यूब चॅनल्सवर तिच्या परवानगीशिवाय वापरली आहेत.
याप्रकरणी आर्याने या युट्यूब चॅनेल्स विरोधात कॉपीराईटचा दावा करण्याचा प्रयत्न केला परंतु, तिच्याकडे मूळ कार्यक्रमांचे व्हिडीओ नसल्याने ती काहीच करु शकत नसल्याने यावर तोडगा कसा काढता येईल? असा सवाल आर्याने या व्हिडीओद्वारे उपस्थित केला आहे. आर्याने हा संपूर्ण व्हिडीओ इंग्रजी भाषेत शेअर केला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत तिला मराठी भाषेत संवाद साधण्यास सांगितलं होतं. या ट्रोलर्सला आर्याने देखील सडेतोड उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
आर्याने कमेंट करत लिहिले की, “जे लोकं मी मराठीत बोलले नाही म्हणून नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांना सांगावंस वाटते, मला तुमच्या भावना कळत आहेत, पण माझ्याबरोबर झालेली ही फसवणूक इतर भाषेतल्या सुद्धा कुठल्याच गायकांबरोबर व्हायला नको असं मला मनापासून वाटतं आणि त्यासाठीच सगळ्यांना कळेल अशा इंग्रजी भाषेत मी व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू प्रत्येक संगीतकाराला अलर्ट करणे हा होता. तरीही तुमच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून मी सॉरी म्हणते. तुम्ही सुद्धा मुख्य मुद्दा काय आहे ते समजून घेतलं तर मला बरं वाटेल,” असे म्हणत आर्याने ट्रोल करणाऱ्यांना हा व्हिडिओ इंग्रजी भाषेत बनवण्यामागचे कारण स्पष्ट केले.