इटानगर :- अरूणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगॉंग अपांग यांनी नव्या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. अरूणाचल डेमोक्रॅटिक पार्टी (एडीपी) असे त्या पक्षाचे नाव आहे.
नवा पक्ष स्थापण्याआधी 74 वर्षीय अपांग धर्मनिरपेक्ष जनता दलात (जेडीएस) सक्रिय होते. त्याआधी प्रदीर्घ काळ ते कॉंग्रेसचे अरूणाचलमधील प्रमुख नेते होते. तब्बल सात वेळा त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला. अरूणाचलच्या राजकारणावर प्रामुख्याने कॉंग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षांचा पगडा आहे. त्या राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे.
विविध राज्यांत प्रादेशिक पक्षांचा प्रभाव दिसतो. तो विचारात घेऊन अपांग यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची भूमिका मांडताना राष्ट्रीय पक्षांना टीकेचे लक्ष्य केले.
हायकमांड (पक्षश्रेष्ठी) व्यवस्थेने अरूणाचलची लूट केली. त्या व्यवस्थेचे अनेक वाईट अनुभव मला आले. विकासनिधीसाठी राष्ट्रीय पक्षांवर अवलंबून राहण्याच्या पारंपरिक राजकारणापासून मला मुक्त व्हायचे आहे, असे त्यांनी म्हटले.
अरूणाचलमध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत.