पिंपरी – कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ताथवडे येथे शनिवारी (दि. 3) पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
यातच पोलीस तपासात आता या आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळींवर राजेश साप्ते यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीस पोलिसांनी अटकही केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असं मयत राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे.
दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून, चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.
साप्ते यांनी “त्या’ व्हिडिओत काय म्हटले आहे?
राजेश साप्ते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला. त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितले आहे. “”नमस्कार मी राजेश मारुती साप्ते, मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे.
हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मौर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.
माझं पुढचं काम राकेश मौर्या सुरू करू देत नाहीत. माझ्याकडे सध्या पाच प्रोजेक्ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरू करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे”, असे साप्ते यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच, मला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी याच व्हिडिओतून केली आहे.