सातारा -आनेवाडी टोल नाक्यावर गेल्या वर्षी 25 मार्च रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित सोपान दिनकर चोरगे (वय 32, रा.वांगणी, ता. वेल्हे जि. पुणे) यास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. हा संशयित दोन वर्षांपासून फरारी होता. त्याला “मोक्का’ लावण्यात आला आहे.
या प्रकरणी पांडुरंग घनश्याम पवार (वय 37, रा. चिंचवली, ता. वाई) यांनी फिर्याद दिली होती. आनेवाडी टोल नाक्यावर टोल भरण्यावरून झालेल्या वादातून गावठी पिस्तुलामधून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये गोळी लागून पांडुरंग पवार हे जखमी झाले होते. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयितांनी संघटितपणे अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर “मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
गुन्हा केल्यानंतर या संशयिताच्या साथीदारांना अटक झाली होती; परंतु चोरगे हा पोलिसांना हुलकावणी देत होता. तो त्याच्या मूळ गावी वांगणी येथे येणार असल्याची खबर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, राजेंद्र चंदनशिव, मंगेश भगत, लियाकतअली मुजावर, अक्षय जावळे, अमोल शेडगे यांनी वांगणी गावच्या हद्दीत कल्याण खिंड परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्यास पुढील कारवाईसाठी भुईंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.