पणदरेचे सुपुत्र प्रा. डॉ. मनीष कोकरे यांचा नवी दिल्ली येथे विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर्स ऍवार्डने गौरव
बारामती – येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रा. डॉ. मनिष कोकरे यांना नोकरीसाठी नाकारले होते. मात्र, देशपातळीवरील विश्वेश्वरय्या “बेस्ट टीचर्स’ अवॉर्डने त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आल्याने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकतो हे डॉ. कोकरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
पणदरे येथील सुपुत्र प्रा. मनीष कोकरे यांना नवी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते विश्वेश्वरय्या पुरस्कारने गौरव करण्यात आला. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे मनीष कोकरे सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले. विश्वेश्वरय्या जयंती व अभियंता दिवसाचे औचित्य साधत यंदाअभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना एसआयटीई दिल्ली तर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पुरस्कारासाठी संपूर्ण देशातून 12 जणांची निवड झाली. बारामती तालुक्यातील पणदरे येथील सुपुत्र व नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर मनीष कोकरे यांचा त्यामध्ये समावेश आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रातील देश-विदेश पातळीवरील केलेले संशोधन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यातून दर्जेदार विद्यार्थी घडत आहेत. ही बाब माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीय पातळीवरील मिळालेल्या विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर ऍवार्डमुळे हे अधोरेखित झाले आहे. इथून पुढील काळात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्यपूर्व प्रयत्न केले जातील.
– प्रा. डॉ. मनीष कोकरे, पुरस्कार विजेते