नवी दिल्ली -पुढील महिन्यापासून (1 जुलै) सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेत सुमारे 40 खाद्यपदार्थांना मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय, यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना शारीरिक तंदुरूस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात सांगण्यात आले आहे.
दक्षिण काश्मीरमध्ये हिमालयीन रांगांमध्ये 3 हजार 880 मीटर उंचीवर पवित्र अमरनाथ मंदिर वसले आहे. तेथील यात्रेसाठी श्री अमरनाथ देवस्थान मंडळ सज्ज झाले आहे. त्या मंडळाने यात्रेआधी यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, यात्रेच्या तयारीचा भाग म्हणून दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान 5 किलोमीटर चालण्याचा, योगा, प्राणायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आरोग्यदायी आहाराची शिफारस करताना मंडळाने विविध प्रकारची पेये, फ्राईड आणि फास्ट फुड पदार्थांवर फुली मारली आहे. हेवी पुलाव, फ्राईट राईस, पुरी, भटुरा, पिझ्झा, बर्गर, स्टफ्ड पराठा, डोसा, फ्राईड रोटी, ब्रेट विथ बटर, क्रिमपासून बनवलेले पदार्थ, लोणचे, चटणी, फ्राईड पापड, चाऊमिन आदींना मनाई करण्यात आली आहे. मद्यपान, धुम्रपान आणि कॅफिन टाळण्यास सांगण्यात आले आहे. धान्ये, डाळी, हिरव्या भाज्यांशी संबंधित पदार्थांबरोबरच सॅलड खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.