Lashkar Terrorist Shot Dead : 2015 मध्ये जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर हल्ल्याची योजना आखणारा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी अदनान अहमद उर्फ हंजला अदनान याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्याला ठार केले असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, 2 आणि 3 डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हंजला अदनानची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वृत्तानुसार, अदनान हा 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर प्रमुख हाफिज सईदच्या जवळचा मानला जात होता.
अदनानला त्याच्या घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराने गुप्तपणे कराची येथील रुग्णालयात नेले. जिथे त्याचा ५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर लष्कराच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. तर बीएसएफचे १३ जवान जखमी झाले होते. याशिवाय 2016 मध्ये हंजलाने पंपोरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावरही हल्ला केला होता, ज्यामध्ये 8 जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्यातही या दहशतवाद्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अलीकडच्या काळात पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांना अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. याआधी मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारखे दहशतवादी मारले गेले आहेत. 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या प्लॅनिंगमध्ये सहभागी असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला पाकिस्तानच्या तुरुंगात विष प्राशन करण्यात आल्याचे उघड झाले होते. साजिद मीरला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.