मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने येथे झालेल्या एका प्रदर्शनिय सामन्यात आपल्या वादळी फलंदाजीने उपस्थितांना जणू सचिनचीच आठवण करुन दिली. त्याने पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट अ च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात 31 चेंडूत 77 धावांची वादळी खेळी केली.
अर्जुनने 77 धावात 5 चौकार आणि आठ षटकार फटकावले. त्याने एकाच षटकांत पाच षटकार लगावताना आपणी आपल्याच वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत आक्रमक फलंदाजी करु शकतो हे देखील दाखवून दिले. त्याच्या या वादळी फलंदाजीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने 45 षटकांत 7 बाद 387 धावा केल्या. इस्लाम जिमखान्याला केवळ 191 धावाच करता आल्या. अर्जुनने गोलंदाजीतही चमक दाखवताना 3 बळीही मिळवले. त्यामुळे एमआयजीला 194 धावांनी विजय मिळवता आला.
अर्जुनच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे आता येत्या गुरूवारी होत असलेल्या आयपीएलच्या लिलावात अनेक संघ त्याला घेण्यास उत्सुकता दाखवतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स संघ अर्जुनवर बोली लावतील.
अर्जुन गेल्या काही हंगामात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करतोय. यंदा होत असलेल्या लिलावात त्याची 20 लाख रुपये बेस प्राईज ठेवण्यात आली आहे.