मार्चपासून शाळाबाह्य मुलांचा शोध

करोनामुळे यंदा मोहिमेला विलंब : यंदा मुलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता

पुणे – करोनामुळे शाळा बंद असल्याने राज्यातील शालाबाह्य मुलांची शोध मोहिम राबविण्यास विलंब झाला आहे. आता ही मोहिम मार्चमध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे.

करोनामुळे केलेल्या लॉकडाउमुळे मार्च 2020 पासून शाळा बंद होत्या. इयत्ता नववी ते बारावीवे वर्ग 23 नोव्हेंबरपासून, तर पाचवी ते आठवीचे 27 जानेवारीपासून सुरू झाले. मात्र, इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा अद्यापही बंदच आहेत. त्या कधी सुरू होणार याबाबत अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले नाही.

प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम राबविण्यात येते. मागील सर्वेक्षणात सुमारे 35 हजार विद्यार्थी शोध लागला होता. प्रामुख्याने जानेवारीमध्ये घरोघरी जावून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात येतो. त्यानंतर वयोगटानुसार मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात येतो. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची शिक्षकांवर जबाबदारी असते.

राज्यात एकूण 2 हजार 782 बालरक्षक आहेत. त्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने “एक गाव, एक बालरक्षक’ मोहिम घेण्यात येत आहे. याची जबाबदारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे आहे. त्याप्रमाणे किती बालरक्षकांच्या नियुक्‍त्या केल्या, त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना आहेत.

करोनामुळे बहुसंख्य पालक विविध ठिकाणी जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाल्याने यंदा शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता आहे. शोध मोहिमेसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सप्टेंबरमध्ये 4 हजार शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शोध मोहिमेत मोबाइल ऍपचा वापर करण्यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम सुरू करण्याबाबत सविस्तर प्रारुप आराखडा तयार करून तो शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर शासनाकडून लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. शासन निर्णय झाल्यानंतर मोहिमेस वेग येईल.

– दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.