बारामती – नटराज नाट्य कला मंडळ, बारामती यांच्या वतीने आयोजित 34व्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत पुणे येथील समर्थ अकादमीने सादर केलेल्या “आर. यू. ब्लाईंड?’ या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, असे संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार (दि. 12) ते शनिवार (दि. 14) या कालावधीत या स्पर्धा कै. वसंतराव पवार नाट्यगृह, बारामती येथे पार पडली. या स्पर्धेत, द्वितीय – क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई या संस्थेने सादर केलेल्या कोरड या एकांकिकेस तर तृतीय क्रमांक – आगम, पुणे या संस्थेने सादर केलेल्या गुंफण या एकांकिकेस मिळाला.
पारितोषिक विजेत्या संघांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ तसेच संस्थेचे ज्येष्ठ सभासद दीपक गुजर, प्रदीप परकाळे, संजय जाधव, संजय खडके, विनोद रावळ, सुनील जगताप यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आली. परीक्षक म्हणून मकरंद गोडबोले व कमल हावळे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रशांत काटे-देशमुख, विनय आगवणे, संकेत नरुटे आदींनी परिश्रम घेतले.