पुणे- डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 या दिवशी सातारा येथे झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण लागू हेदेखील डॉक्टर होते. आईचे नाव सत्यभामा होते. डॉ. लागू यांचे शिक्षण पुण्यात भावे हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच डॉ. लागू यांना नाटकाची गोडी लागली. त्यांनी त्यावेळेसच नाटकात काम करण्याला सुरूवात केली. पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर पगडा असल्याने त्यांनी समविचारी असलेल्या भालबा केळकर यांच्यासह पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान, नाक, घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे डॉक्टरकी केली. त्यानंतर त्यांनी परदेशात कॅनडा आणि इंग्लंड येथेही पुढील प्रशिक्षण घेतले. 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. मात्र त्यात त्यांचे मन रमले नाही. त्यांचा ओढा रंगभूमीकडेच होता. शेवटी 1969 मध्ये त्यांनी डॉक्टरकी सोडली आणि पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित “इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्याला सुरूवात केली.
कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या “नटसम्राट’ या नाटकात त्यांनी “अप्पासाहेब बेलवलकर’ ही प्रमुख भूमिका साकारली आणि ती अजरामर केली. त्यातील संवाद फेक ही रसिकांच्या विशेष लक्षात राहिली. नंतर “सिंहासन’, “पिंजरा’, “मुक्ता’ सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. “पिंजरा’ या चित्रपटातील “मास्तर’ची भूमिकेने त्यांना अभिनयाच्या अत्युच्च स्थानी नेले. त्यांच्या पत्नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत. त्यांनी आत्मचरित्रपर “लमाण’ हे पुस्तकही लिहिले आहे.