कोंढवा दुर्घटना : आर्किटेक्‍ट, स्ट्रक्‍चरल इंजिनिअर ब्लॅकलिस्टेड – चंद्रकांत पाटील

कोंढवा दुर्घटनेच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती

मुंबई (प्रतिनिधी) – कोंढवा दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 बळींचे संतप्त पडसाद सोमवारी उमटले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आर्किटेक्‍ट व स्ट्रक्‍चरल इंजिनिअर यांची लायसेन्स निलंबित करण्यात आली असून पुणे महापालिकेने त्यांना ब्लॅकलिस्ट केले असल्याची घोषणा केली. तसेच या दुर्घटनेची सहा सदस्यीय समिती चौकशी करत असून 8 दिवसांत या समितीचा अहवाल येणार आहे, असे त्यांनी विधानसभेत सांगितले.

पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्याची चर्चा होते. नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष होते. बांधकाम व्यावसायिक दोन-तीन महिने बेपत्ता राहतात आणि पुढे काहीही होत नाही, याकडे अजित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.

पोकलेनच्या आवजाने हादरे बसत असल्याची तक्रार शेजारच्या सोसायटीतील लोकांनी केली होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही. भविष्यात असा निष्काळजीपणा दाखवण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

योगेश टिळेकर यांनी या ठिकाणी दुर्घटना घडली तर रूग्णवाहिका, फायरब्रिगेडच्या वाहनांनाही जाण्याची वाट नाही. त्यामुळे डीसी रूलमध्ये वहिवाटीच्या रस्त्यांना जास्त प्राधान्य देण्यात आले पाहिजे व दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागातील 6 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. एनडीआरएफकडून प्रत्येकी चार लाख, बांधकाम महामंडळातून प्रत्येकी 5 लाख, तर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचा प्रस्ताव तयार होत आहे. मृतांच्या वारसांची ओळख पटविण्यात येत असून त्यानंतर मदतीचा चेक देण्यात येईल. सर्व मृतांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हवाईदलाच्या विशेष विमानाने त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहेत, असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.