पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची नवी मुंबई येथे बदली झाली आहे. 4 एप्रिलपासून ते त्याठिकाणी रुजू होणार आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी नवीन अधिकारी येणार आहे. अशी बातमी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शुक्रवारी सकाळी वाऱ्यासारखी पसरली. दुसरीकडे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी देखील नवी मुंबईलाच बदली मागून घेतली असल्याच्या चर्चांना एक एप्रिलला जास्तच उधाण आले. दुपारपर्यंत या एप्रिल फूलमधील हवा निघून गेली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील आहेत. निवडणुका लांबल्याने त्यांची प्रशासक पदी देखील नियुक्ती झाली आहे.गेल्या एक वर्षापासून आयुक्त पाटील शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण, पाणीपुरवठा तसेच राहण्यायोग्य शहर बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शुक्रवारी (दि. 1 ) एक एप्रिल अर्थात एप्रिल फूल असल्याने पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील एकमेकांची चेष्ठा करत थेट आयुक्तांचीच बदली केली. सकाळी महापालिकेचे कामकाज सुरू होताच चौथ्या मजल्यावरील एका कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना आयुक्त पाटील यांची बदली झाली असल्याचे सांगितले. ही बातमी चौथ्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत वाऱ्यासारखी पसरली. लिफ्ट कर्मचाऱ्यांपासून ते अतिरिक्त आयुक्तापर्यंत याच विषयाची चर्चा सुरू होती.
अवघ्या अर्ध्या तासामध्ये ही बातमी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील पोहचली. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी महापालिका भवनमधील आपल्या सहकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क करून खातरजमा करत होते. ही बातमी फक्त पिंपरी चिंचवड शहरापुरतीच मर्यादित राहिली नाही तर नागपूर व नवी मुंबईमध्ये देखील या विषयाची चर्चा झाली असल्याचे एका कर्मचाऱ्यांनी सांगितले.
तसेच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचीही बदली होणार असल्याची अफवा गेल्या आठवड्याभरापासून शहरामध्ये पसरली आहे. आयुक्तांनी स्वत: बदली मागितली असल्याचे सांगण्यात येत होते. पिंपरी-चिंचवडमध्ये विश्वास नांगरे पाटील पोलीस आयुक्त म्हणून येणार असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु आदल्याच दिवशी आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या चर्चा अफवा ठरली होती. परंतु यानिमित्ताने पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या बदलीची चर्चा जोरदार रंगली.