पुणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत कामावर हजर होण्याची मुदत दिली होती. या “अल्टिमेटम’च्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात 31 मार्च रोजी सुमारे 36 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर अद्यापही संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महामंडळाने दिले आहेत.
ऑक्टोबर अखेरपासून राज्यातील सर्व आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपकऱ्यांच्या मागण्यांपैकी वेतनवाढीबाबत सरकारने घोषणा करत 10 तारखेपर्यंत पगार करण्याची ग्वाही देखील राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली. यासह महामंडळाकडून सातत्याने कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चपर्यंत हजर व्हावे, त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांना दिला होता. त्यानंतर पुणे विभागात सुमारे 100 हून अधिक कर्मचारी हजर झाले आहेत. पुणे विभागात 3 हजार 784 असून, त्यापैकी 1 हजार 207 कर्मचारी हजर झाले आहेत. त्यापैकी शेवटच्या दिवशी (31 मार्च) 36 कर्मचारी हजर झाले. यामध्ये चालक, वाहक आणि यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.