पिंपरी – मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने महापालिकेशी संबंधित अभिलेखांमध्ये उपलब्ध असलेल्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून दस्तावेजांची पूर्तता करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्ती करण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1948 ते 1967 या कालावधीतील जन्म-मृत्यू नोंदी, शैक्षणिक अभिलेख, भूमी अभिलेख, सेवानोंद पुस्तके तसेच महापालिकेच्या करआकारणी नोंद रजिस्टरमध्ये कुणबी जातीच्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करावी. त्याचा अहवाल शासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सादर करण्यासाठी निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, भूमी व जिंदगी, लेखा विभाग तसेच करआकारणी व करसंकलन विभागाच्या प्रमुखांनी 1948 ते 1967 या कालावधीमध्ये महापालिकेच्या उपलब्ध अभिलेखांची छाननी करून अभिलेखांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी असल्याचे आढळून आल्यास अशा पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे. विभागप्रमुखांनी नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामकाज पूर्ण करावे, असे आदेशात नमूद केले आहे.
नोडल अधिकाऱ्यांना विशेष अधिकार
या कामकाजासाठी संबंधित विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती करावी, पुराव्याच्या तपासणीअंती विभागस्तरावर स्वतंत्र रजिस्टर तयार करावे. विवरण पत्रामध्ये माहितीच्या नोंदी आणि संकलन करून ते नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करावे. नोडल अधिकाऱ्यांना आवश्यकता वाटल्यास अधिकची माहिती अथवा पुरावे जमा करणेकामी संबंधित विभागांना अथवा विभागप्रमुखांना निर्देश देता येणार आहेत. हे काम कालमर्यादित असून विहीत वेळेत कामकाज पूर्ण करावे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.