पुणे -अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. यात या नराधम अनिल पवार याने आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी एका महिलेसह दोघांना अटक केली. विशेष म्हणजे हवालदाराने रेल्वेच्या जागेत बेकायदा “सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था’ सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. या संस्थेत हवालदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. दरम्यान, हवालदाराने साथीदारांच्या मदतीने रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा संशय आहे. या दृष्टीनेही लोहमार्ग पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्थानकात पळून आलेल्या मुलींना हेरण्यासाठी संस्थेतील कामगारांना काम दिले होते. त्यांना तो दरमहा पैसे द्यायचा. त्याच्या संस्थेच्या रजिस्टरमध्ये तब्बल 200 जणांची नोंद आहे. पसार झालेल्या पवारला निलंबित करण्यात आले असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. त्याला पोलीस दलातील आणखी कोणी साथ देत होते का? हेही तपासले जात आहे.