शिक्षण विभागात मानधनावर सल्लागार नेमणार

सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालकांकडून आयुक्‍त कार्यालयाने मागविले अर्ज

पुणे – शिक्षण विभागातील ई-गव्हर्नन्स, पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती, विभागीय चौकशीसाठी मार्गदर्शिका तयार करणे या कामांसाठी सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालकांची सल्लागारपदी मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांकडून शिक्षण आयुक्त कार्यालयाने अर्ज मागविले आहेत.

शिक्षण विभागातील विविध गतीने पूर्ण करता यावीत यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही काम करण्याची संधी देण्यात येते. यासाठी शासन निर्णयाची अंमलबजावणी करूनच नियुक्ती देणे आवश्‍यक आहे. शालेय शिक्षण विभागांतर्गत विविध संचालनालयामार्फत विविध शैक्षणिक व प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर करावा लागतो आहे. यात सरल, शालार्थ, पवित्र, संचमान्यता, अकरावी प्रवेश, यू-डायस प्लस, डीबीटी पोर्टल, आरटीई 25 टक्‍के ऑनलाइन प्रवेश, शाळा सिद्धी, लर्निंग असेसमेंट, पीजीआय इंडिकेटरर्स, ई-बालभारती, शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण, दीक्षा पोर्टल, डिजिटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक या विषयांबाबत सल्लागार नेमण्याची गरज भासू लागली आहे.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

इच्छुक उमेदवारांना या पदासाठी 8 नोव्हेंबरपर्यंत शिक्षण आयुक्‍त कार्यालयात अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शारीरिक, मानसिक या आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्रही दाखल करावे लागणार आहे. कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसलेल्या व चौकशी प्रकरणी शिक्षा न झालेल्या अधिकाऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. कोण कोण दिग्गज अधिकारी अर्ज करणार व यातील कोणाची लॉटरी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here