‘आरआयएमएसी’च्या प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करा

पुणे – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयातील (आरआयएमसी) प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्याकरिता 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 1 व 2 डिसेंबर रोजी पुण्यात ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

ही परीक्षा केवळ मुलांसाठीच आहे. अकरा वर्षे सहा महिने पेक्षा कमी व तेरा वर्षांपेक्षा पेक्षा अधिक वय नसलेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असलेला किंवा सातवीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सैन्य महाविद्यालयातील आठवीच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षेला बसता येणार आहे. या परीक्षेसाठी डेहराडून येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाच्या विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागणार आहे. भरलेले अर्ज पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाकडे मुदतीत स्पीड पोस्टाने पाठवावे लागणार आहेत. या कार्यालयात समक्ष येऊनही अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

अर्ज दोन प्रतीत भरणे आवश्‍यक असून त्यासोबत जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत, जातीच्या दाखल्याची छायांकित प्रत, अधिवासी दाखल्याची सत्यप्रत, शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत आदी कागदपत्रे जोडावी लागणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी इंग्रजी, गणित, सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असणार आहेत. इंग्रजी अथवा हिंदी भाषेतही पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती येत्या 7 एप्रिल रोजी होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.