पवना बंद जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागू

चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच : शेतकऱ्यांना पर्यायी जलवाहिनीचा पर्याय

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील लोकसंख्या वाढीचा दर विचारात घेता पिण्याच्या पाण्यासारखा मूलभूत प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी पवना बंद जलवाहिनीचा प्रश्‍न सामंजस्याने सोडवावा लागणार आहे. थेट बंद जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवडला पाणी दिल्यास शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही, अशी भीती मावळच्या शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध होत असून त्यांना पर्यायी जलवाहिनी देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी येथे दिले.

भाजपमध्ये आला म्हणजे आरोप नष्ट होत नाहीत !
भाजप व शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर “इनकमिंग’ सुरू आहे. त्यामुळे युती होण्यासाठी कोणतीही अडचण नसून भाजप-शिवसेना युती नक्की होणार, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. भाजपने आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या कोणालाही पक्षात घेतले नाही. आरोप असणारा कोणी जर पक्षात आला. तर, तो पक्षात आल्यामुळे त्याच्यावरील आरोप नष्ट झालेत, असे होत नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील सर्व “केसेस’ न्यायालयात सुरु आहेत. न्यायालयाने राज्य सहकारी बॅंकेसंदर्भात आदेश दिला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. जलसंपदा विभागाकडील सर्व विषय न्यायालयात सुरू आहे. न्यायालय जी सूचना करेल, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असेही पाटील म्हणाले.

पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच पिंपरी-चिंचवडमधील राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत महापालिका भवनात सुमारे सव्वा तास बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांना बैठकीविषयी माहिती दिली. राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 1982 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली, त्यावेळी तीन लाख लोकसंख्या होती. ती आज 27 लाखांवर पोहचली आहे. परिणामी पाण्यासाठी मागणी वाढत आहे. बंद जलवाहिनीमुळे शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पर्यायी जलवाहिनीचा पर्याय पुढे आला आहे. या प्रकल्पाला होत असलेल्या विरोधातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडवत आणला आहे. यातून नक्कीच मार्ग निघेल, असा दावा पालकमंत्र्यांनी केला.

…त्यांची कामे मार्गी लागतात
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेत त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सर्व खर्चाचा भार महापालिकेवर पडू नये, यासाठी येथील प्राध्यापकांचे वेतनाचा खर्च शासन उचलणार आहे. ज्याला दिल्लीत व मंत्रालयात फाईल्स पुढे सरकविता येतात, प्रश्‍नांचा पाठपुरावा करता येतो. त्यांची कामे मार्गी लागतात, असे अनुभवाचे बोल सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले की, शहरातील प्रलंबित प्रश्‍नांचा केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी महापालिका स्तरावर एक जबाबदार व्यक्ती व पालकमंत्री या नात्याने आपल्याकडील एका जबाबदार व्यक्‍तीची नियुक्‍ती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापनाची पालकमंत्र्यांना भुरळ
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन व मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कौतुक केले. राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना अभ्यासासाठी याठिकाणी पाठवावे लागेल, महापालिकेच्या काही मैलाशुद्धीकरण केंद्रांतून वीज निर्मिती केली जाते. ही देखील प्रशंसनीय बाब आहे. महापालिकेकडून घनकचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला अधिकाधिक गती दिली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पूरग्रस्त गावांना मदतीचा हात द्या
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा होत आहे. याखेरीज भाजपचे राज्यभरातील सुमारे 20 हजार लोकप्रतिनिधी 1 महिन्याचे मानधन आपदा निधीसाठी देत आहेत. पिंपरी-चिंचवडमधूनही भाजपच्या लोकप्रतिनिधींनी 51 लाखांचा मदतीचा धनादेश आपल्याकडे सुपूर्द केला आहे. याखेरीज आमदार महेश लांडगे शंभर गावांमधील तालमींच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार आहेत. या धर्तीवर पूरग्रस्त गावातील गावांच्या पुनर्वसनासाठी इतरांनीही पुढाकार घ्यावा. पूरग्रस्त भागातील मुलींच्या विवाहाचा खर्च, शाळा उभारणी, मंदिर उभारणी अशा वेगवेगळ्या कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.