इंदापूर -सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तरीदेखील भरणे हे गावागावात जाऊन 2024पर्यंत इंदापूर तालुक्याचा कायापालट केला नाही तर, जनतेच्या दारात मत मगायला येणार नाही. असे ठणकावून सांगतात.
असे असतानाच इंदापूर तालुक्यातील झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविवारी झालेल्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांची यादीच जाहीर सभेत वाचून दाखवत त्यांचे तोंड भरून कौतुक केले.
तर खासदार सुप्रिया सुळे यांनी माझे काम राज्यमंत्री दत्तात्रय भरणेच करतात. मी फक्त इंदापूर तालुक्यात उद्घाटनाला येते असे जाहीर सभेत सांगितले. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामकाजाची क्रेझ पवारांच्या कौतुकाने वाढलेली आहे.
तालुक्यात भाजपला राजकीय खिंडार पाडण्यात दत्तात्रय भरणे यशस्वी झाले आहेत. त्यांनी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी सारख्या ग्रामीण भागात तब्बल 25 ते 30 हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व जाहीर पक्षप्रवेश घेऊन आपली ताकद दाखवून दिली. इं
दापूर पंचायत समितीच्या सभापती स्वातीताई शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, युवक नेते दीपक जाधव, शिवाजी तरंगे यांच्या जाहीर पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोबल वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 1260 कोटी रकमेचा निधी इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी भरणे यांनी आणला आहे. ही आकडेवारी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगत विकास कामांचा मंत्री म्हणून गौरव केला.
मनोबल वाढले
केंद्र सरकारच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात पर्यटन क्षेत्रासाठी एक मोठा प्लॅन कुंभारगाव कडबनवाडी या ठिकाणी करण्याचा मानस आहे. राज्यात सामाजिक न्याय विभागाचा अधिकचा निधी इंदापूर तालुक्याच्या वाट्याला राज्यमंत्री भरणे यांच्या प्रयत्नातून आलेला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तब्बल सहा ते सात महत्त्वाची राज्यातील खाती सांभाळण्याची जबाबदारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे आहे त्यामुळे त्यांना जनतेला सात विभागातील पदार्थ वाढता येतात, असा शाब्दिक गौरव सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.
भाजपला आव्हान
भाजपतील मातब्बर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गळाला लागल्याने आगामी काळात इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीची नवी फळी कामाची दमदार उभी करण्याची भूमिका राज्यमंत्री भरणे यांनी घेतलेली दिसते. भरणे यांना मिळणारी ताकद व शासनाचा मिळणारा निधी या दोन वाहत्या प्रवाहांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आगामी काळात कशी टक्कर देणार, यावर गावोगावी चर्चा सुरू झाली आहे.