पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठ यांनी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी एकत्रितपणे “यूओएम-एसपीपीयू अकॅडमी’ची स्थापना केली. या अकॅडमीच्या माध्यमातून या दोन्ही विद्यापीठांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांना एकमेकांच्या विद्यापीठात जाऊन प्रशिक्षण व अध्यापन करता येणार आहे. शिवाय, संयुक्त प्रकल्पही हाती घेता येणार आहेत.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाने अशा प्रकारे स्थापन केलेली ही पहिलीच अकॅडमी आहे. याचे बुधवारी उद्घाटन “इंटरडिसीप्लिनरी स्कुल ऑफ सायन्स’ येथे करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. अविनाश कुंभार, मेलबर्न विद्यापीठाचे उपकुलगुरू मिशेल वेसले, प्रा. मुथुपंडियन अशोककुमार, विज्ञान शाखेच्या प्रा. मोयरा ओब्रॅंन उपस्थित होते.
मेलबर्न विद्यापीठासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी.एस्सी. (ब्लेंडेड) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र अशा चार विषयांचे मूलभूत शिक्षण दिले जाते. दरम्यान, “बी.एस्सी. ब्लेंडेड केल्यानंतर मेलबर्न विद्यापीठातून “एम.एस्सी. ब्लेंडेड’ केलं असून सध्या मेलबर्न विद्यापीठामध्ये संशोधन करत आहे. मेलबर्नमध्ये पुढील अभ्यासक्रम करण्यासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. संकेतस्थळावर जाऊन या सगळ्याची व्यवस्थित माहिती घेणे गरजेचे आहे,’ असे मेलबर्न विद्यापीठात सध्या संशोधन करणारी विद्यार्थिनी ऋचा पाटील हिने स्पष्ट केले.
मेलबर्न विद्यापीठाबरोबर झालेल्या करारातून सध्या आपण विज्ञान शाखेत अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ही केवळ सुरुवात असून भविष्यात सामाजिक शास्त्र, शिक्षणशास्त्र, डिजाइन थिंकिंग आदीही विषयात अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ