शिक्रापूर- पिंपळे खालसा ता. शिरूर येथे नागरिकांना बिबट्याचे दर्शन होऊ लागले असून परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याने येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहे.
पिंपळे खालसा परिसरातील मुक्ताईनगर या परिसरात बिबट्याचे अनेक शेतकऱ्यांना दर्शन झाले आहे. गणेश धुमाळ यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी संपर्क साधला असता या ठिकाणी आमचे अधिकारी जाऊन आले असून तेथे पिंजरा लावला असून गरज पडल्यास अजूनही एखादा पिंजरा लावला जाईल, असे त्यांनी सांगितले.