मावीन वर्ष जवळ येऊन ठेपलं. आता सगळ्यांनाच नवं कॅलेंडर आणि डायरी किंवा दैनंदिनीची ओढ लागते. पूर्वी आपल्याकडे छोट्या डायरी असायच्या आणि डायरी कशासाठी तर रोजचा खर्च लिहिण्यासाठी आणि ठराविक घटना नोंदवण्यासाठी लागायची.
काळ बदलला पण डायरी मात्र आपल्या सोबत कायम राहिली.
काळ बदलला तसं डायरीचं स्वरूप बदलले. उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना दर तासाला वेगवेगळी कामे, मीटिंग असतात. त्यामुळे दिवस तासात विभागलेला करून डायरी तयार झाली. नंतरच्या काळात विशिष्ट विषयाला वाहिलेल्या डायरी तयार करण्यात येऊ लागल्या. याचा उपयोग वृत्तपत्र, बातम्या, संशोधन, अभ्यास यासाठी होऊ लागला. हा उपयोग फक्त एवढाच नाही. तर आपल्या मनातले विचार प्रत्येक वेळी बोलून दाखवता येत नाहीत परंतु ते व्यक्त होणं आवश्यक आहे. मनात हे विचार साठवून ठेवता येत नाही. त्यासाठी डायरीत ते विचार मांडणे. काही प्रसिद्ध व्यक्तींचे डायरी लेखन अत्यंत वाचनीय आणि रंजक असते. डायरी कशी लिहावी याचा तो उत्तम नमुनाच म्हणा ना!
अनेक जणांना आपलं जीवाभावाचे आणि जवळचे कुणी नसलं तर डायरी त्यांची सखी होऊ शकते. काही जणांना रोजची कामे व्यवस्थित टिपून ठेवून करायला आवडतात. त्यामुळे दैनंदिन कामे पार पडतात. काळानुसार कॅलेंडरचा प्रकारही बदलले. कॅलेंडर वाचनीय होऊ शकते हे अनेक वर्षे कुणाच्या मनात आले नव्हते. घरी वापरण्यासाठी, ऑफिससाठी वेगळे कॅलेंडर त्या सोयीने तयार केलेले त्यात स्मरणात ठेवण्याच्या तारखा अधोरेखित केल्या जातात.
शिवाय साहित्यिक, धार्मिक स्थळे, किल्ले यावर वाहिलेली कॅलेंडर आली जी लोक संग्रही ठेवू लागले. पूर्वी अभिनेत्री अभिनेते यांचे फोटो असत. त्यात बदल झाले. कॅलेंडर केवळ वर्षभर भिंतीवर लावायचे, वर्ष संपले की बदलून टाकायचे इतकाच उपयोग न करता काही नोंदी त्यावर होऊ लागल्या. तशा चौकटी मोठ्या झाल्या.
अलीकडे वाढदिवस, वर्धापनदिन इत्यादीसाठी शुभेच्छा देण्याचे प्रमाण वाढले आणि अशा कॅलेंडरची गरज निर्माण झाली. प्रेक्षणीय स्थळांचे फोटो असलेल्या डायरी लोकप्रिय होऊ लागल्या. नवे वर्ष जवळ येतेय त्या निमित्ताने बाजारात फेरफटका मारून यातले वैविध्य पाहूया आणि नवे वर्ष उत्तम जाईल अशी आशा करू.
– डॉ. नीलम ताटके