अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बाहेरख्यालीपणाची किंमत मोजावी लागली होती. लोकशाही मार्गाने निवडून आले; मात्र लोकशाहीच्याच गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पराभव करून निवडून आलेले बायडेन हेही आता पुत्राच्या हैदोसाने अडचणीत आले आहेत. त्यांची वाटचाल ट्रम्प यांच्या मार्गावरून दिसत आहे. त्यांनाही आता महाभियोगाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
भारतात झालेल्या जी 20 परिषदेला हजेरी आणि त्यानंतर व्हिएतनामचा दौरा करून अमेरिकेत परतताच अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यापुढे काय अडचणी वाढवून ठेवल्या आहेत, याची त्यांना कल्पना नसावी. अमेरिकेच्या “हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’चे रिपब्लिकन स्पीकर केविन मॅककार्थी यांनी बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. पुढील वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक असताना बायडेन यांच्या पुढे एकामागून एक अडचणी वाढताना दिसत आहे.
आता बायडेन यांच्या अडचणीमागील कारण म्हणजे त्यांचा मुलगा हंटर. बायडेन त्यांचा मुलगा हंटर. परदेशातील व्यवहाराबाबत खोटे बोलल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत; मात्र बायडेन यांचा मुलाच्या व्यवसायाशी काहीही संबंध नसल्याचे “व्हाइट हाउस’ने म्हटले आहे. हंटर अजूनही वेगळ्या कारणाने वादात आहे. 2021 मध्ये त्यांच्यावर वडिलांच्या खात्यातून 25 हजार डॉलर्स एका कॉल गर्लला ट्रान्सफर केल्याचा आरोप होता. हंटर यांनी त्या महिलेसोबत काही वेळ घालवल्याचे वृत्त आहे.
53 वर्षीय हंटर हे ज्यो बायडेन यांचे पहिले पुत्र आणि नीलिया हे दुसरे पुत्र आहेत. नीलिया आणि हंटरच्या बहिणीचा 1972 मध्ये अपघाती मृत्यू झाला. हंटर एक उद्योजक, व्यापारी म्हणून ओळखले जातात. याशिवाय त्यांना चित्रकलेचीही आवड आहे. 1993 मध्ये, त्यांनी कॅथलीन बुलीशी लग्न केले आणि त्यांना तीन मुली आहेत. 2017 मध्ये त्यांचे लग्न मोडले आणि त्यानंतर त्यांचे आपल्या मृत भावाच्या पत्नीशी संबंध आले.
2019 मध्ये तिच्यापासून वेगळे झाल्यानंतर, त्यांनी दक्षिण आफ्रिकन चित्रपट निर्मात्या मेलिसा कोहेनशी लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगा आहे. हंटर बायडेन स्वतःची सर्व माहिती लॅपटॉपमध्ये ठेवत असे. एकदा तो लॅपटॉप दुरुस्तीच्या दुकानात विसरला. त्यानंतर हा लॅपटॉप “एफबीआय’च्या हाती आला. त्यात त्यांची अनेक वैयक्तिक छायाचित्रे होती. याशिवाय कॉल गर्ल्सशी संबंध आणि पैशांची देवाणघेवाणही समोर आली.
अमेरिकन संसदेतील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याने संपूर्ण सभागृहासमोर हंटर बायडेन यांची वैयक्तिक छायाचित्रे दाखविली होती. तिचे नाव मार्जोरी टेलर ग्रीन आहे. या छायाचित्रांमध्ये हंटर वेश्यांसोबत दिसत होता. मार्जोरी हिने हंटरवर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. ती म्हणाली, कोणतीही व्यक्ती कोणत्याही अनैतिक कृत्यासाठी महिलेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही.
हंटरच्या बाजूने असे सांगण्यात आले, की मार्जोरी पैसे कमवण्यासाठी ही युक्ती वापरत आहे.
हंटरच्या लॅपटॉपमधून सुमारे आठ हजार फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये ते आक्षेपार्ह अवस्थेत दिसतात. ते ड्रग्ज घेतानाही दिसत होते. अमेरिकन राज्यघटनेत लाचखोरी, बलात्कार किंवा देशद्रोहासाठी महाभियोगाचा उल्लेख आहे; मात्र हा महाभियोग यशस्वी होणार नसल्याचे बायडेन समर्थकांद्वारे सांगितले जात आहे. यासाठी रिपब्लिकन पक्षाला “हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये बायडेन यांच्या विरोधात मतदान करावे लागेल. या सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत नाही.
हंटर बायडेन यांची ही पहिलीच चूक नाहीये. त्यांच्यावर डेलावेअरच्या जिल्हा न्यायालयात प्राप्तिकर न भरणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हंटर बायडेन यांनी 2017 आणि 2018 मध्ये 1.5 दशलक्ष डॉलरचा कर परतावा न भरल्याचा आरोप आहे. या दोन वर्षांतील त्यांच्या उत्पन्नावर एक लाख डॉलरहून अधिक रक्कम थकबाकी आहे. याशिवाय बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे. या वेळी ते ड्रग्जही घेत होते. हंटर बायडेन यांनी न्याय विभागाशी करार केल्याचा आरोप मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात येत आहे. तुरुंगाबाहेर राहण्यासाठी हा करार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
करारानुसार, हंटर हे करचुकवेगिरीचा गुन्हा कबूल करतील. ड्रग्ज घेण्याच्या आणि बेकायदेशीर शस्त्रं बाळगल्याच्या आरोपांवरही हंटर कबुलीजबाब देऊ शकतात. हंटर यांनी मान्य केले आहे, की त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर ते अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेले. हंटर बायडेनचे वकील ख्रिस क्लार्क यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की “प्री-ट्रायल डायव्हर्जन’ कराराचा भाग म्हणून ते गुन्हा कबूल करतील. सैद्धांतिकदृष्ट्या अध्यक्षांच्या मुलाला प्रत्येक कर शुल्कात जास्तीत जास्त एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि शस्त्र बाळगल्याच्या आरोपात दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. न्याय विभागाने एका निवेदनात म्हटले आहे, की खटल्यातील न्यायाधीशानं या कराराला मान्यता देणे आवश्यक आहे. कराच्या आरोपांवरील आपले म्हणणे दाखल करण्यासाठी हंटर हे न्यायालयात कधी हजर होतील हे अस्पष्ट आहे.
बायडेन यांच्या कार्यकाळात बेकायदेशीर सीमेवरील घुसखोरीच्या घटना वाढल्या. त्यापैकी बहुतेक क्युबन आणि निकारागुआचे लोक होते. न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यो बायडेन यांच्या घरातून सहा गोपनीय कागदपत्रे जप्त केली आहेत. पूर्वीचे अध्यक्ष ट्रम्प यांनी काही काळ कागदपत्रे स्वतःच्या घरी नेऊन ठेवली होती. त्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागले होते. आता बायडेन त्याच वाटेवरून चालले आहेत. ही गोपनीय कागदपत्रे बायडेन उपराष्ट्रपती होते, त्यावेळची आहेत.
पद सोडण्यापूर्वी त्यांनी गोपनीय कागदपत्रे सोबत नेल्याचा आरोप आहे. बायडेन कुटुंबीयांच्या घराची झडती घेतली असता सहा गोपनीय कागदपत्रे सापडली आहेत. बायडेन यांचे वैयक्तिक वकील बॉब बाऊर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अमेरिकन न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी डेलावेरमधील बायडेन यांच्या कुटुंबाच्या घराच्या झडतीदरम्यान आणखी सहा गोपनीय कागदपत्रे जप्त केली आहेत; परंतु बायडेन यांनी आरोप नाकारले आहेत. आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले होते. वकील बाऊर म्हणाले, की जप्त केलेली काही नवीन कागदपत्रे बायडेन हे सिनेटर असतानाची आहेत. सरकारी कागदपत्रे घरी नेल्याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात खटला सुरू आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी बायडेन यांच्यावरील ही ऐतिहासिक कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तपासात बायडेन यांच्यावरील आरोप खरे ठरले, तर त्यांना हटवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाऊ शकते. सभापती मॅककार्थी यांनी दावा केला की, हाऊस ओव्हरसाइट कमिटीच्या आतापर्यंतच्या तपासात बायडेन कुटुंबाभोवती भ्रष्टाचाराची संस्कृती आढळली आहे. सत्तेचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यासाठी प्रतिनिधीगृहाने पुढील तपास करणे आवश्यक आहे. हे पाऊल राजकीय हेतुने प्रेरित असल्याचे “व्हाइट हाउसने म्हटलं आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येईल तशी वरील आरोपांची व्याप्ती वाढत जाईल. एकमेव महासत्तेच्या सर्वशक्तिमान राष्ट्रप्रमुख पुत्राच्या हैदोसाने पुरता अडचणीत सापडला आहे.
– आरिफ शेख