२७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर (लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष :
कामाचा उत्साह वाढवणारे ग्रहमान आहे. व्यवसायात अवघड अशक्य वाटणाऱ्या कामात यश मिळवाल. पैशाची स्थिती सुधारेल. नोकरीत वेगळ्या कामामुळे थोडे सतर्क रहाल. योग्यवेळी योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे मार्गी लावाल. नवीन व्यक्तींशी मैत्री होईल. प्रवासाचे योग येतील. घरात कोणावरही विसंबून राहू नका. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्या. महिलांनी उकर कामे काढू नयेत. अध्यात्मिक प्रगती साधावी. महिलांना आवडते छंद जोपासता येतील.
वृषभ :
केलेल्या कामाचे ताबडतोब पैसे मिळतील ही अपेक्षा ठेवू नका. तेव्हा व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. हितचिंतकांची मदत आवश्यक तेथे घ्या. नोकरीत कामाची योग्य आखणी करा. कामातील बेत गुप्त ठेवा. भविष्याची तरतूद करून ठेवा. घरात हेकट स्वभावाचा त्रास इतरांना होईल तरी लवचिक धोरण राखण्याचा प्रयत्न ठेवा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशगमनाची संधी येईल.
मिथुन :
सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव घ्याल. त्यातूनच शहाणे बनून योग्य कृती करा. व्यवसायात महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्या. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. नोकरीत कामात बिनचूक रहा. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मर्जी/भिस्त तुमचेवर राहील. जोडधंद्यातून विशेष कमाई करण्याची संधी मिळेल. घरात वातावरण गढूळ राहील. मनातील शंका निरसन वेळीच करा. म्हणजे चुकीची मार्गक्रमणा थांबेल.
कर्क :
ग्रहांची मर्जी तुमचेवर आहे. त्यामुळे कमी श्रमात जास्त यश संपादन करू शकाल. व्यवसायात उद्दिष्टे व धोरणे ठरवून कृती करा. वेळेचे बंधन ठेवून कामांना गती द्या. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ आता मिळेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. मात्र अतिविश्वास टाळा. घरात इतर व्यक्तींचे अंतरंग ओळखून वागा. मुलांकडून सुवार्ता कळेल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल. प्रकृतीचे तंत्रही सुधारेल.
सिंह :
तुमच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. मनातील बेत/इच्छा प्रत्यक्षात साकार करण्याची सुसंधी मिळेल. व्यवसायात कामात दक्ष राहा. जुनी देणी देऊन मगच नवीन कामात लक्ष घाला दिलेला शब्द व आश्वासनं पाळा. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. कामात तत्पर राहा. सहकारीही कामात मदत करतील. घरात तुम्हाला जे योग्य वाटेल तेच कराल. महिलांना मनाजोगती खरेदी करण्याचा आनंद मिळेल.
कन्या :
तुमच्या कर्तृत्वाला झळाळी देणारे ग्रहमान लाभले आहे. त्याचा लाभ घ्या. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लवचिक धोरण स्वीकारून कामाचा वेग व फायदा वाढवा. कामात विस्तार करून उत्पन्न वाढवण्यावर भर राहील. पैशाची चिंता मिटेल. पैशामुळे आलेला तणाव कमी होईल. नोकरीत पगारवाढ, बढती व बदलीच्या प्रयत्नांना यश येईल. वरिष्ठ कामानिमित्ताने सुविधा व सवालही देतील. घरात शुभकार्ये ठरतील.
तुळ :
तुमच्या कामाच्या स्वभावामुळे भावनेला प्राधान्य द्याल व तेथेच निराशा पदरी येईल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींचा कार्यकारण भाव काय आहे? हे कळणार नाही. त्यामुळे आपले काम बरे की आपण बरे! हे धोरण ठेवा. प्रगतीला पूरक संधी चालून येतील. परंतु, त्याची पडताळणी घेऊन मगच पुढे जा. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास घडेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना मतलबापुरती तुमची आठवण येईल. घरात क्षुल्लक कारणावरून वादविवाद होतील.
वृश्चिक :
स्वयंसिद्ध राहण्याचा तुमचा स्वभाव आहे. परंतु, या सप्ताहात इच्छा नसतानाही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल. व्यवसायात पैशाची चणचण भासेल. त्यामुळे कामांना विलंब होईल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करणे अनिवार्य होईल. नोकरीत स्वतःचे काम उरकून इतरांनाही मदत कराल. वरिष्ठांना तुमचेकडून बरीच अपेक्षा राहील. घरात सहजीवनाचा आनंद उपभोगता येईल. किरकोळ वादविवाद होतील. तरी शांत रहा.
धनु :
अडथळ्यांची शर्यत पार करून पुढे जाण्याचा ध्यास असेल. त्यास यशही मिळेल. थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात इतरांवर विसंबून न राहता कामाचे नियोजन योग्य करा. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्या. पैशाची सोय ओळखमुळे होईल. नोकरीत वरिष्ठांना दिलेला शब्द पाळा. अनपेक्षित कामाची जबाबदारी वाढेल. त्यामुळे तुमचे व कामाचे महत्त्व इतरांना कळून येईल. अतिविश्वास टाळा. घरात कौटुंबिक जीवनातील स्वप्ने साकार होतील.
मकर :
शनी तुमचा राशीधिपती आहे. त्यामुळे स्वतःला हवे तसे बिनबोभाट करण्यात तुमचा हातखंडा आहे. व्यवसायात योग्य व्यक्तींकडून योग्य कामे करून घेऊन कामांना गती द्याल. नवीन पद्धतीच्या कामासाठी धोरणात बदल करावा लागेल. भविष्याची तरतूद योग्यप्रकारे करून ठेवाल. नोकरीत वेगळ्या कामामुळे तुमची धावपळ होईल. वेळेचे बंधनामुळे तुम्हाला जादा काम करावे लागेल. घरात महत्त्वाचे प्रश्न हाताळताना गोंधळाची अवस्था होईल.
कुंभ :
घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्याल. व्यवसायात काही बदल करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढले तरी ते खर्च आवश्यकच असतील. भांडवलासाठी पैशाची उभारणी करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. त्यामुळे सोडून देण्याचे विचार मनात येतील. पण घाई नको. कामानिमित्ताने प्रवासाचे योग. घरात नेहमीच्या कामांकडे दुर्लक्ष होईल व नको त्या कामात बराच वेळ जाईल. सभोवतालच्या व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळणे कठीण जाईल.
मीन :
तुमच्या मनाशी तुम्ही ठाम रहाल. व्यवसायात प्रगत समाधानकारक राहील. हितचिंतकांची मदत योग्य वेळी मिळेल. कामांना गती येईल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत स्वतः पुढाकार घेऊन कामे पूर्ण कराल. उत्साही रहाल. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे कर्तृत्व दिसून येईल व कौतुकाची थाप मिळेल. घरात वातावरण आनंदी राहील. सुवार्ता कळेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. अपेक्षित पत्रे हाती येतील. प्रकृती सुधारेल.