भोर -भोर तालुक्यातील वीसगांव खोऱ्यातील मौजे नेरे येथील एक रुग्ण (दि.14) करोनाबाधीत सापडला असताना त्यांच्या संपर्कातील त्या कुटुंबातील 10 जणांना त्याच दिवशी पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. यापैकी 6 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत तर 4 जणांचे रिपोर्ट येणे अजून बाकी आहेत.
दुसऱ्यादिवशी त्याच गावातील करोनाबाधित रुग्णाच्या घराशेजारील संसर्गात आलेल्या 11 जणांना पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. यातील या रुग्णाच्या चुलत भावाच्या एका मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने भोर तालुक्यात आता करोना बाधित झालेल्यांची संख्या दोन झाली आहे, अशी माहिती भोर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली आहे.
डॉ. कऱ्हाळे म्हणाले की, पहिल्या करोना बाधित रुग्णाची एक विवाहित मुलगी सासोळा (ता. भोर) येथे आहे. तीही त्याच्या संसर्गात आल्याने तेथील 10 जणांना तपासणीसाठी पुणे येथे पाठवलेले आहे. त्यांचे रिपोर्ट अजून प्राप्त झालेले नाहीत. त्यांचे रिपोर्ट काय येतात, याकडे आरोग्य विभाग व भोर प्रशासनाचे लक्ष लागले आहे. करोना विषाणुचा प्रादुर्भाव भोर तालुक्यात झाल्याने भोर प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
नेरे गावचा तीन किलोमीटरपर्यंतचा भाग क्वारंटाइन केला आहे. 5 किलोमीटरपर्यंत बफर झोन जाहीर केलेला आहे. या भागात संचारबंदी असून ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे. भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी गावच्या सर्व मार्गावर चारही बाजूंनी बॅरिकेटस लावून मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. तास पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील आशासेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक, शिक्षण सेवक, ग्रामसेवक, शाखा अभियंता यांच्यामार्फत तपासणी, यादी घेऊन प्रत्येक घरी भेट द्यावी, हायरिस्क लोकांची यादी करण्याचे आदेश दिले आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना संशयित रुग्णांची माहिती देण्याचे सूचित केले आहे. हाय रिस्कमधील लोकांना घरीच थांबण्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या 15 दिवस लक्ष ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महसूलचे कोतवाल यांच्यावर सोपवाण्यात येत आहे. कार्यवाहीच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
– विशाल तनपुरे, गट विकास अधिकारी, भोर