नवी दिल्ली- आयकर विभागाने कॉंग्रेसला पुन्हा १७४५ कोटी रूपये वसुलीच्या नवीन नोटीसा जारी केल्या आहेत. त्यामुळे आयकर विभागाने आत्तापर्यंत कॉंग्रेसला एकूण ३५६७ कोटी रूपये वसुलीच्या नोटीसा जारी केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कर नोटिस २०१४-१५ (६६३ कोटी रुपये), २०१५-१६ (सुमारे ६६४ कोटी रुपये) आणि २०१६-१७ (सुमारे ४१७ कोटी रुपये) शी संबंधित आहेत.
अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना उपलब्ध कर सवलत संपवली आहे आणि संपूर्ण संकलनासाठी पक्षाला कर लावला आहे, असेही ते म्हणाले.
छाप्यांदरम्यान तपास यंत्रणांनी कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडून जप्त केलेल्या डायरीमध्ये केलेल्या नोंदीसाठी देखील काँग्रेसवर कर आकारण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आयकर खात्याने कॉंग्रेसच्या खात्यातून १३५ कोटी रूपये आधीच जप्त केले आहेत. तसेच कॉंग्रेसशी संबंधीत सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या आधीही कॉंग्रेसला १८२३ कोटी रुपयांच्या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान काँग्रेसने १३५ कोटी रुपयांच्या कर जप्ती विरोधात न्यायालयात धाव घेतली असून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. या संदर्भात आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळवण्यात पक्षाला अपयश आले आहे.
काँग्रेस नेत्यांनी असा दावा केला आहे की इतर डायरीमध्ये भाजप नेत्यांची नावे असलेल्या तृतीय-पक्षाच्या नोंदींवर कोणताही कर लावला गेला नाही. चालू लोकसभा निवडणुकीत भाजपने “कर दहशतवाद” सुरू केला असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे.