पुणे : अगोदरच विक्री झालेल्या जमिनीच्या व्यवहारापोटी 20 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांच्यासह तिघांवर खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला. शैलेश जगताप यांच्यावर आतापर्यंत कोथरुड, समर्थ आणि आता खडक अशा तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, शैलेश जगताप आणि इतर आरोपींनी अशाप्रकारे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना तक्रार करण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले. शैलेश जगताप, प्रकाश फाले (रा. सांगवी) आणि मिना कंजारी (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सत्यभामा पोपट चांदगुडे (रा. चिखली) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली. ही घटना नोव्हेंबर 2015 मध्ये मामलेदार कचेरीमध्ये घडली होती.
शैलेश जगताप, देवेंद्र जैन, रवींद्र बऱ्हाटे यांच्यावर कोथरुड आणि समर्थ पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या समर्थ पोलिसांनी जैन, जगताप यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. या दोन गुन्ह्यानंतर पोलिसांनी आवाहन केले होते. यासंदर्भातील वृत्त वाचून सत्यभामा चांदगुडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मिना कंजारी यांनी आपली उंड्री येथील जागा 2012 मध्ये विकली होती. तरीही त्यांनी दोन गुंठा जागा विकायची असल्याचे सांगितले. त्यासाठी शैलेश जगताप व प्रकाश फाले यांच्या मध्यस्थीने व्यवहार करण्यात आला. तसेच औंध येथील जमिनीच्या व्यवहारपोटी सत्यभामा चांदगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून आरोपींनी 20 लाख रुपये घेतले. त्यापैकी 1 लाख रुपयांची इसार पावती मामलेदार कचेरीमध्ये केली होती.
परंतु, चांदगुडे यांना ही जागा अगोदरच विकली असल्याचे समजल्यावर त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा शैलेश जगताप यांनी पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून आपण गप्प बसल्याचे चांदगुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे करीत आहेत.
कोथरुड पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन 2 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी शैलेश जगताप, देवेंद्र जैन आणि रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यात जामीन मिळण्याच्या आदल्या दिवशी समर्थ पोलीस ठाण्यात 72 लाख रुपयांच्या जमीन व्यवहारात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आता शैलेश जगताप यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा रविवारी रात्री दाखल झाला.