धोका वाढला; बाधितांची “शतका’कडे वाटचाल
पिंपरी – गेल्या आठवडाभरापासून शहरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच सोमवारी (दि. 27) पुन्हा त्यामध्ये मोठी भर पडली आहे. एकाच दिवसांत आणखी अकरा जणांचे अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 96 वर पोहोचली आहे. बाधित रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आल्यामुळे हे रुग्ण करोनाबाधित झाले आहेत. सर्व रुग्ण रुपीनगर, पिंपरी आणि काळेवाडी फाटा परिसरातील आहेत.
शहरात पहिल्या टप्प्यात परदेशातून आलेल्या 12 रुग्णांना करोना झाला होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात दिल्लीतून आलेल्या तबलिगींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 2 एप्रिल रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला होता. यानंतर गेल्या 20 दिवसांत शहरात तब्बल 84 रुग्ण सापडले असून, संशयीतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर चार जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. गेल्याच आठवड्यात एका दिवशी 12 रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा एकाच दिवसात 11 रुग्ण सापउल्याने खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळच्या टप्प्यात (रविवारी रात्री साडेसहा ते सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत) चार जणांचा अहवाल “पॉझिटिव्ह’ आला होता. यामध्ये तीन तरुणांचा समावेश असून, ते 26 ते 28 या वयोगटातील आहेत. तर एका 25 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. हे सर्वजण रुपीनगर परिसरातील रहिवाशी असून गेल्या तीन आठवड्यात रुपीनगर परिसरातील रुग्णांची संख्या ही 17 च्या वर पोहोचली आहे. सर्वजण यापूर्वी बाधित असलेल्या रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आल्याने या रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
सोमवारी दुपारच्या टप्प्यात सोमवारी (सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत) आणखी सातजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 पुरुषांचा समावेश असून यातील एकजण 32 तर एकजण 77 वर्षीय इसम आहे. तर एका 12 व 17 वर्षीय मुलीसह पाच महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित तीन महिला या 18 ते 40 वयोगटातील आहेत. हे सर्व रुग्ण पिंपरी, रुपीनगर आणि काळेवाडा फाटा परिसरातील आहेत. आज बाधितांची संख्या 11 ने वाढल्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ही 96 वर पोहोचल्याने करोना बाधितांच्या शतकाच्या उंबरठ्यावर शहर पोहोचले आहे.
आज दिवसभरात पुन्हा नव्याने 171 संशयीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाले असून त्यापैकी 164 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आजपर्यंत महापालिकेच्या वतीने 2199 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यापैकी 1948 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 29 जण आतापर्यंत करोनामुक्त झाले असून, चार बाधितांचा मृत्यू झाला आहे.
त्यापैकी तिघेजण महापालिका हद्दीतील असून, एकजण पुणे शहरातील आहे. तसेच 219 संशयीत व बाधितांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 9 बाधितांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्यामुळे प्रशासनापुढील आव्हान वाढू लागले आहे. एका बाजूला वाढणारे रुग्ण तर दुसऱ्या बाजूला नियमांची पायमल्ली असे विरोधाभास निर्माण करणारे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.