सदस्यांमधून नाराजीचा सूर; सर्व विषय एकमताने मंजूर
सातारा – जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेस अध्यक्ष उदय कबुले हेच तब्बल दोन तास उशिरा आल्याने सदस्यांमधून नाराजीचा सूर उमटला. या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी दुपारी 1 वाजता स्थायी समिती सभागृहात झाली. या सभेस उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सदस्य आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले हेच तब्बल दोन तास उशिरा आले.
त्यामुळे सभा 3 वाजता सुरू झाली. याबाबत सदस्यांनी उघड नाराजी व्यक्त केली नसली तरी असे प्रकार होऊ नयेत, याची पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशी कुजबूज सदस्यांमध्ये होती.
स्थायी समितीच्या सभेपूर्वी सदस्यांनी विषय देणे गरजेचे आहे. ऐनवेळी येणाऱ्या विषयांची संख्या जास्त आहे, असे मत उदय कबुले यांनी व्यक्त केले. यापूर्वी दि. 4 जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला.
स्थायी समितीच्या मागील (4 जानेवारी) झालेल्या सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. शासनाकडून आलेले शासन निर्णय, परिपत्रकांचे अवलोकन करण्यात आले. जिल्हा ग्रामविकास निधी, मासिक लेखे मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामविकास निधीतून 12 कोटी 78 लाख 52 हजार 230 रुपये आणि व्याजासह 13 कोटी 71 लाख 21 हजार 516 रुपयांची पुनर्गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती सचिव मनोज जाधव यांनी अहवाल वाचन केले.