मांडवगण फराटा- आंधळगाव (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती शिरूर व पशुवैद्यकीय दवाखाना वडगाव रासाई यांच्या संयुक्त विद्यमाने कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत जनावरांच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्हावरेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक अवताडे व डॉ. पी. एन. पोमन यांनी पशूपालकांना जनावरांना होणाऱ्या आजारांबाबत माहिती दिली. शिबिरामध्ये जंत निर्मूलन, गोचीड निर्मूलन, क्षार मिश्रण विटा वाटप, वंध्वत्व जनावरांची तपासणी आदी सेवा पशूपालकांना देण्यात आल्या.
या शिबिरामध्ये 108 पशूपालकांनी सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घेतला. वडगाव रासाई पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. डी. एच. ढुबे, डॉ. सुजित शेलार, नितीन पवार, गणेश मेत्रे, गणेश गुंड, ए.डी. कुंभार यांनी शिबिर पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सोसायटीचे संचालक गोरक्ष ओव्हाळ, विलास कुसेकर, सदस्य नंदकुमार दाभाडे, पत्रकार प्रमोल कुसेकर, रमेश भोसले, रामभाऊ दिवेकर, संजय कुसेकर आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या योजनेसाठी कृषी पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार व जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांच्या विशेष प्रयत्नातून कामधेनू योजना पूर्णत्वास नेण्यात आली. सन 2018 ते 2019 मध्ये कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत आंधळगाव या योजनेत निवड करण्यात आली होती. आंधळगाव येथे जनावरांच्या तपासणीच्या शिबिर सरपंच रतन सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.