मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोनदा समन्स बजावल्यानंतर ते कार्यालयात हजर झाले. यासंदर्भात त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. यावरून भाजपने परब यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची पुन्हा शपथ घेऊन सांगतो मी काहीच चुकीचं केलं नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परब यांच्यावर टीका केली आहे.
परब हे शिवसेनाप्रमुखांची शपथ का घेतात ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शपथ का घेत नाही?, असा खोचक सवाल नितेश राणे यांनी केला. तसेच अनिल परब तो झांकी है, उद्धव ठाकरे अभी बाकी है, असं सूचक विधान नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राणेंच्या विधानावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय अनिल परब हे सकाळी शर्ट पण घालत नाहीत. अशा व्यक्तीला तुम्ही चौकशीला बोलावल्यावर उद्धवजींच्या छातीत धडकी भरल्यासारखं झालं आहे. अनिल परब तो झांकी है उद्धव ठाकरे अभी बाकी है, असं राणे यांनी म्हटलं. यावर अद्याप शिवसेनेकडून प्रतिक्रिया आलेली नाही.