अनिल गोटे यांचा भाजपला रामराम

आमदारकीचा राजीनामा देत सुभाष भामरेंच्या विरोधात ठोकला शड्डू

धुळे – आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेपासून नाराज असलेल्या गोटे यांनी अखेर आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तर आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला आहे. गोटे उद्या लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

आपण आजही मोदींचे समर्थक असून आपला केवळ मोदींच्या नावाने वाईट उद्योग करणाऱ्यांना विरोध असल्याचे गोटे यांनी सांगितले. आमदारकीचा राजीनामा देताना गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील गंभीर टीका केली. पक्षातील राजकारणाला आपण कंटाळलो असून यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही, असे देखील ते म्हणाले.

धुळे पालिका निवडणुकीत सुभाष भामरे यांनी गोटे यांना बाजूला ठेवले होते. तेव्हापासून गोटे आणि भामरे यांच्यातील वाद टोकाला गेला. बंडखोरी करत असताना यापुढे आपले एकच लक्ष्य आहे ते म्हणजे सुभाष भामरे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता लोकसभा निवडणुकीचे भाजपचे अधिकृत आमदार भामरे यांच्याविरुद्ध त्यांनी लढण्याचे ठरवले आहे. त्यामुळे धुळे मतदारसंघात भामरे-गोटे-कॉंग्रेसचे कुणाल पाटील अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी स्वपक्षाविरोधात आणि भामरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. त्याचवेळी ते भाजपा सोडतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.