मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान सुरु झाले आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान प्रक्रियेत सहभागी झाली आहेत. या निवडणुकीत काहीही झालं तरी आमचेच पाच उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून केला जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक चुरशीची होणार असली तरी आमचा विजय होणार असं महाविकास आघाडीकडून म्हटलं जात आहे. दरम्यान, भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या ट्वीटची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे.
अनिल बोंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे थेट नाव न घेता या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याबद्दल भाकित केले आहे. “काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,” असे बोंडे यांनी म्हटले आहे.
काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा…#MLCElection2022 #MahaVikasAghadi
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 20, 2022
बोंडे यांच्या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण असा प्रश्न अनेकांना पडला असून अनेकजण आपापल्या पातळीवर बोंडे यांच्या ट्वीटचा अर्थ लावत आहेत. दुसरीकडे विधान भवनात विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या पक्षांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी खास योजना आखली आहे. तसा दावा तिन्ही पक्षाचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कोणत्याततरी एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे, असा दावा भाजपाचे नेते करत आहेत.