मुंबई – अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्यातील अफेअर संपण्याचे नाव घेत नाहीय. अँजेलिनाच्या एका कंपनीने ब्रॅड पिटवर सुमारे 1,992 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. हा खटला फ्रेंच वाईनरीबद्दल आहे. दोघांनी मिळून ही वाईनरी खरेदी केली. जुलैमध्ये अँजेलिनाने याबाबत केस दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाच्या न्यायाधीशांनी ब्रॅड आणि त्याच्या टीमला वाइनरीची कागदपत्रे अभिनेत्रीला देण्यास सांगितले. यासह अँजेलिनाने केस जिंकली होती. मात्र, आता या नव्या प्रकरणाने सर्वांनाच धक्का दिला आहे.
या नव्या खटल्यात ब्रॅड पिटने फ्रेंच वाईनरी ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. घटस्फोट आणि कोठडी प्रकरणानंतर त्याने हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. ब्रॅडला अँजेलिनाला वाईनरीच्या नफ्यातील एक पैसाही मिळावा असे वाटत नाही. इंग्रजी मॅगझिनच्या वृत्तानुसार अँजेलिनाच्या कंपनीने लॉस एंजेलिस न्यायालयात हा खटला दाखल केला.
ब्रॅड आणि अँजेलिनाने 2008 मध्ये ही मालमत्ता खरेदी केल्याचा दावाही या खटल्यात करण्यात आला आहे. 1300 एकरमध्ये पसरलेली ही मालमत्ता दक्षिण फ्रान्समध्ये आहे. दोन्ही सेलिब्रिटींनी मिळून ते ठीक करण्यासाठी अनेक दशलक्ष डॉलर्स खर्च केले होते. दोघांनाही या मालमत्तेच्या ५० टक्के हक्क आहे. अँजेलिनाची बहुतांश वैयक्तिक संपत्ती या वाईनरीशी निगडीत असल्याचेही कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे.
ब्रॅड आणि अँजेलिना 2003 मध्ये भेटले. अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. अँजेलिनाने ब्रॅडवर घरगुती हिंसाचार आणि तिच्यासह तिच्या मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप केला. पाच वर्षांच्या विभक्त राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना एकूण सहा मुले आहेत.