सीएए’विरोधी आंदोलनादरम्यान झाली होती अटक
वाराणसी: नागरिकत्व दुरुस्ती कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या आंदोलनादरम्यान अटक झालेल्या कार्यकर्त्या एकता शेखर यांना आज स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि त्यांच्या 14 महिन्यांच्या बाळाला दोन आठवड्यांनी आईची भेट झाली. एकता शेखर आणि त्यांचे पती रवी शेखर हे मेहमूरगंज येथील दाम्पत्य “क्लायमेट अजेंडा’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात. उत्तर प्रदेशात 19 डिसेंबरच्या आंदोलनानंतर त्यांच्यासह अन्य 56 जणांना अटक झाली होती. या सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. मात्र या दरम्यान त्यांच्या 14 महिन्याच्या बाळाची आणि बाळाची आई एकता शेखर यांची ताटातूट झाली होती. या मुद्दयाला प्रसिद्धी माध्यमांनी देशभर प्रसिद्धी दिली होती.
बुधवारी वाराणसीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने एकता शेखर आणि रवी शेखर यांच्यासह अन्य 56 जणांना जामीन मंजूर केला. आपल्या बाळापासून दोन आठवडे दूर राहण्याने एकता शेखर भावुक झाल्या होत्या. आपल्या 14 महिन्यांच्या कन्येला कवटाळून त्यांनी भावना व्यक्त केल्या. “हा विरह इतका दीर्घकाळ असेल, याची आपल्याला कल्पनाही नव्हती.’ असे त्यांनी साश्रु नयनांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.