Anandrao Adsul On Rana । आगामी लोकसभा निवडणूकासाठी आता सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. त्यातच भाजपने काल आपली १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली. मात्र यात महाराष्ट्राच्या एकाही जागेचा समावेश नव्हता. त्यामुळे राज्याच्या बाबतीत मोठा सस्पेन्स तयार झालाय. दरम्यान, असे सगळे सुरु असताना राज्यात शिंदे गटाच्या एका नेत्याच्या विधानाने एकच खळबळ उडालीय.
राजकारण सोडेन पण नवनीत राणाचा प्रचार करणार नाही Anandrao Adsul On Rana ।
“खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वाट्टेल ते बोलण्याची सवय आहे. जे होणार आहे, तेच आम्ही बोलतो. अमरावती लोकसभा मतदार संघातून कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असून एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी दिलीय.
अमरावती लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच Anandrao Adsul On Rana ।
आनंदराव अडसूळ हे निवडणुकीला सामोरे जाणार नसून वडीलकीच्या नात्याने ते नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असे वक्तव्य रवी राणा यांनी अलीकडेच केले होते. त्यावर आनंदराव अडसूळ यांनी आश्चर्य व्यक्त करीत राणांचा दावा खोडून काढला. अडसूळ म्हणाले, गेल्या ८ निवडणुकांपासून युतीत अमरावती लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडेच राहिला आहे. भाजप-सेनेची युती आजही कायम आहे. अमरावती लोकसभेची जागा भाजपची कधीच नव्हती, ती जागा आमचीच आहे.” असा दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना “खरी शिवसेना-शिवसेनेचे नाव-पक्ष चिन्ह सर्व काही आमच्याकडेच आहे. त्यामुळे आम्ही आमचा दावा सोडणार नाही. एकवेळ राजकारण सोडू, पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही. किंबहुना तशी वेळच येणार नसल्याचा दावाही यावेळी आनंदराव अडसूळ यांनी केला. राणा दाम्पत्याला काहीही बोलण्याची सवय आहे. हे सर्व लोक जाणतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देणार, असा सवाल करीत कपड्याच्या आत सगळे नागडे असतात, असा टोला अडसूळ यांनी लगावला.