पुणे – कडक उन्हाळ्याची काहिली संपली असून, अखेर शनिवारी पुण्यात मोसमी पावसाने सलामी दिली. त्यामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शहरासह उपनगरांत थांबून-थांबून पाऊस सुरूच होता. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर थांबून थांबून पाऊस सुरू होता.
यात हडपसर, उंड्री-पिसोळी, जांभूळवाडी, कात्रज, आंबेगाव, नऱ्हे, धायरी, वारजे, खडकवासला, शिवणे, कोथरूड, बावधन, बाणेर, शिवाजीनगर, औंध, मुंढवा, पुणे कॅन्टोन्मेंट, स्वारगेट, बिबवेवाडी, येरवडा, वडगावशेरी, विश्रांतवाडी भागांत अधूनमधून पाऊस सुरूच होता. दरम्यान, या पहिल्याच पावसाने सर्वांना दिलासा मिळाला असला, तरी शहरातील काही भागांत आणि खोदाई झालेल्या ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. मात्र महापालिकेने त्यांची यंत्रणा सतर्क ठेवल्याचा दावा केला आहे.
सध्या पावसाचा जोर फारसा नसला तरी तरी मागील काही वर्षांचा विचार करून महापालिकेला सतर्क रहावेच लागणार आहे. दरम्यान, मागील आठवड्यात शहराचे तापमान सातत्याने 32 ते 34 अंशांच्या आसपास राहिले होते. त्यातच आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाड्यातही वाढ झाली. पण, शनिवारी सायंकाळी अवघे 23.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद शहरात झाली आहे.
परिसर आणि पाऊस (मि.मी.)
लोणावळा – 31.5, गिरीवन – 23.5, एनडीए – 21.5, बारामती – 14.6, दौंड – 13, लवासा – 11, हडपसर – 10.5, पाषाण – 7, चिंचवड – 10.5, हवेली – 6.5, लोहगाव – 15.2, पुरंदर – 4, शिवाजीनगर – 13.5, कोरेगावपार्क – 2, लवळे – 2.5, मगरपट्टा – 1, खेड – 0.5