सोनियांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
नवी दिल्ली – दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची एक बैठक बोलावून त्यात राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्षाच्या भावी धोरण निश्चीतीसाठी 17 वरीष्ठ नेत्यांच्या एका गटाची स्थापना करण्यात आली असून या गटामध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, राहुल गांधी यांच्या सह अन्य नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तथापी या गटात प्रियांका गांधी यांचा मात्र समावेश नाही. राजीव सातव, रणदीप सुर्जेवाला, ज्योतिरादित्य शिंदे, सुश्मिता देव इत्यादी नवीन नेत्यांनाही या गटात स्थान देण्यात आले आहे. आसामातील एनआरसीविषयीही पक्षाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच या विषयावर पुन्हा सविस्तर बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. आर्थिक स्थितीवरून सरकारचे अपयश लोकांपुढे अधिक ठळकपणे मांडण्याचाहीं यावेळी निर्णय झाला.