नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने आता आम आदमी पक्षाचे दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी त्यांनी आमच्या पक्षाच्या सात आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रूपयांची ऑफर दिली आहे. तसेच ही ऑफर न स्वीकारल्यास कारवाईची धमकीही त्यांना दिली गेली आहे असा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे. दिल्ली भाजपने मात्र हा आरोप फेटाळून लावला आणि आपला आव्हान दिले आहे की त्यांनी ऑफरसह त्यांच्याशी संपर्क साधलेल्या आमदारांची नावे सांगावीत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की आमच्या सात आमदारांना भाजपकडून ही ऑफर मिळाली आहे. मला स्वत:लाही लवकरच अटक केली जाईल अशी धमकीही भाजपने दिली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, कॉल करणाऱ्यांनी दावा केला आहे की ते २१ आप आमदारांच्या संपर्कात आहेत. दिल्ली सरकार पाडल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी आमदारांना २५ कोटी रुपये आणि प्रत्येकाला भाजपचे तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु ज्यांना ही ऑफर दिली गेली आहे त्या सातही आमदारांनी पक्ष सोडण्यास नकार देऊन भाजपची ही ऑफर धुडकावली आहे असे त्यांनी म्हटले आहे.दिल्लीतील आप सरकार पाडण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत अनेक कट रचले गेले, परंतु ते सर्व अपयशी ठरले, असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान दिल्ली भाजपचे सचिव हरीश खुराना यांनी केजरीवालांचा आरोप धुडकावून लावला असून ज्या आमदारांना अशी ऑफर देण्यात आली आहे त्यांची नावे केजरीवालांनी जाहीर करावीत असे आव्हान त्यांनी दिले आहे. केजरीवालांना ईडीचे समन्स जारी केले गेले आहे, त्यावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी केजरीवालांनी हा दिशाभूल करणारा दावा केला आहे असे त्यांनी म्हटले आहे.