पिंपरी, (प्रतिनिधी) – मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शहरातील ६५० शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी ४७५ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांची तपासणी होऊन अधिकृत पात्र शाळांची यादी जाहिर करण्यात येईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. १८ मार्च पर्यंत शाळांची नोंदणी करण्याची अंतिम तारिख होतील.
शहरातील शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, खासगी शाळांमध्ये आरटीई कायद्यांतर्गत मोफत प्रवेश मिळणार आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. महापालिकेसह खासगी शाळांचा देखील समावेश आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दरवर्षी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा रिक्त ठेवल्या जात होत्या.
शहरात सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना आरटीईतून मोफत प्रवेश मिळत होता. पण, आता घरापासून एक किलोमीटरवरील कोणत्याही शाळेत त्याला प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खासगी इंग्रजी शाळेत प्रवेश घेता येणार नाही. ज्यांच्या घरापासून एक किलोमीटरवर शासकीय तथा खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा पण इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, त्यांनाच त्या शाळेत प्रवेश मिळणार आहे.
गेल्या वर्षी शहरातील १७५ शाळांनी आरटीई कायद्यांतर्गत नोंदणी केली होती. या वर्षी १८ मार्च पर्यंत नोंदणीची मुदत दिली होती. त्यानुसार शहरातील ६५० शाळांनी नोंदणी केली आहे. आरटीई प्रवेशाला यंदा उशिर झाला असला तरी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे सादर करून पाल्यांना प्रवेश घेता येणार आहे. यामध्ये मुलाच्या आई-वडिलांचे ओळखपत्र मुलाचे ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बेघर मूल किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र, मुलाचा फोटो आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.