जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्येत वाढ

शिक्षण पद्धतीतील बदलामुळे पालक समाधानी

परिंचे – परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली असल्याचे पहायला मिळत आहे. बदलत्या आधुनिक शिक्षण पद्धती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मिळत असल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

पाच वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. या शाळांमधून इंग्रजी भाषेबरोबर, डिजिटल वर्ग, संगणकीय ज्ञान, खेळाची साधने, बौद्धिक विकासासाठी उपक्रम राबविले जात असल्यामुळे पालक मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळांकडे आकर्षित झाले होते. या सुविधा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मिळत नसल्याने तसेच शैक्षणिक दर्जा ढासळत असल्याने त्याचा परिणाम पटसंख्येत मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होत्या. अनेक शाळांमध्ये दोन शिक्षक आणि दहा विद्यार्थी अशी परिस्थिती पहायला मिळत होती.

त्यामुळे गाव पातळीवर शैक्षणिक कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आल्या आहेत. शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करून दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी, सामाजिक शिक्षण प्रेमी यांच्या माध्यमातून शाळेला निधी उपलब्ध होत असल्याचे मुख्याध्यापक भारत वाघोले यांनी सांगितले. सुंदर हस्ताक्षर, पाढे पाठांतर, स्पेलिंग पाठांतर आदी उपक्रम दैनंदिन असून, खेळ, गाणी, गोष्टी या माध्यमातून मुलांचे अनौपचारिक शिक्षण दिले जात आहे.

आपली संस्कृती टिकवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे उपशिक्षिका प्रतिमा गुरव
यांनी सांगितले.

शासनाने प्राथमिक शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल केले असून, विविध योजना राबवून ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. परिसरातील सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. इ. 1लीपासून इंग्रजी, सेमी इंग्रजी, संगणकीय शिक्षण, आनंददायी शिक्षण, बोलक्‍या भिंती, विविध मूल्यांची रुजवणूक, स्पर्धा परीक्षेची तयारी, मातृ भाषेतून शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होत आहे.
– राजेंद्र कुंजीर, केंद्रप्रमुख माहुर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)