भारतात पाच वर्षात महिला बॉसची संख्या दुपटीने वाढली
नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील सर्वच देशांमध्ये महिला बॉसच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ भारताचा विचार करता 2017 नंतर महिला बॉस असण्याचे प्रमाण तब्बल दुपटीने वाढले आहे. ग्रांट थॉरटन या आघाडीच्या संस्थेने आपला रिपोर्ट 2022 नुकताच जाहीर केला असून त्यामध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जगभरातील 29 पेक्षा जास्त देशातील दहा हजार कंपन्यांचा अभ्यास या सर्वेक्षणासाठी करण्यात आला. निष्कर्षप्रमाणे 2017 मध्ये जगभरात महिला बॉसची संख्या 25 टक्के होती. 2022 मध्ये हे प्रमाण 32 टक्केपर्यंत वाढले आहे. केवळ भारताचा विचार करता या पाच वर्षांमध्ये महिला बॉसच्या प्रमाणात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2017 मध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या महिलांची संख्या 17 टक्के होती. 2022 मध्ये हे प्रमाण 38 टक्के पर्यंत पोहोचले आहे. शिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त 30 टक्के, तर बांधकाम क्षेत्रामध्ये सर्वात कमी 14 टक्के महिला बॉस आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांची संख्याही सर्वाधिक आहे.
माध्यम क्षेत्रात महिला बॉस असण्याचे प्रमाण 23 टक्के असून आयटी क्षेत्रातील हे प्रमाण 20 टक्के आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये करोना महामार्गामुळे जी नवीन कार्यसंस्कृती निर्माण झाली त्याचा फायदा महिलांना झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये जे नवीन स्टार्टअप सुरु झाले त्यापैकी 45 टक्के स्टार्टअप महिलांनी सुरू केले होते. देशात सध्या सुमारे 45 कोटी महिला कोणते ना कोणते काम करत असतात.
तर महिलांनी सुरू केलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांची संख्या तब्बल दीड कोटी आहे. 2030 पर्यंत महिलांनी सुरू केलेल्या अशा छोट्या मोठ्या उद्योगांची संख्या 3 कोटीपर्यंत पोहोचेल आणि या उद्योगामध्ये 15 कोटी पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला जाईल असेही या अहवालात म्हटले आहे.